Pages

Monday, March 5, 2018

Icc director/wiki/indra nui/pepsico/income

Icc director/wiki/indra nui/pepsico/income

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) संचालकपदी नियुक्ती झालेल्या इंद्रा नूयी यांचं हे शब्दचित्र...

मोठेपणी कोण होणार असा प्रश्न मुलांना कोणी ना कोणी विचारतोच. मुलंही मग अमुकतमुक होणार असल्याची उत्तरं देतात. लहानग्या इंद्राला जेव्हा तिच्या आईनं हा प्रश्न विचारला, तेव्हा तिचं उत्तर अशाच धाटणीचं; पण तरीही वेगळं होतं. 'खूप मोठ्ठं होणार,' असं ती म्हणाली होती. प्रत्युत्तरादाखल आईनं तिला कानमंत्रच दिला. ती म्हणाली होती, 'जे कोणतं स्वप्न पाहशील, त्याचा पाठलाग कर. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस.' आईचा हा सल्ला तिनं पाळला आणि ती स्वप्नांचा पाठलाग करीत सुटली. त्यामुळे तिची स्वप्नं साकारत गेली.

या गोष्टीतील इंद्रा म्हणजे इंद्रा नूयी. 'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ. जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिलांपैकी एक. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्या सध्या बातम्यांत आहेत. महिला क्रिकेटची आता चर्चा होऊ लागली असली, तरी क्रिकेट हा प्रामुख्याने पुरुषांचाच खेळ. त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्थेवर इंद्रा नूयी यांची झालेली निवड, त्यांची कर्तबगारी अधोरेखित करणारीच आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या, नेतृत्वगुणाच्या, धडाडीच्या जोरावर एका बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिखर स्थानावर पोहोचलेल्या इंद्राच्या शिरपेचात यामुळे आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

चेन्नईतील एका मध्यम वर्गीय कुटुंबात इंद्रा २५ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्मलेल्या इंद्रांचे वडील बँकेत; तर आई गृहिणी. घरची परिस्थिती सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे. इंद्रा आणि त्यांची बहीण चंद्रिका या दोघींना त्यांची आई एकच प्रश्न अनेकदा विचारत, तो म्हणजे- 'तुम्ही मोठेपणी कोण होणार?' दोघींपैकी जिचं उत्तर आवडे तिला त्या बक्षीस देत. 'तुमचं लग्न अठराव्याच वर्षीच करणार आहे; परंतु तुम्ही तुमचं स्वप्न बघणं सोडू नका. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. मात्र, त्यासाठी प्रामाणिकपणा आणि कष्टाची गरज आहे,' असंही त्या म्हणत. आईच्या या विधानांचा आपल्यावर परिणाम झाल्याचं इंद्रा सांगतात.


इंद्रा यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून विज्ञान शाखेतून पदवी मिळविली. त्यानंतर कोलकात्यातील 'आयआयएम'मधून व्यवस्थापनशास्त्राचे धडे घेतल्यानंतर काही कंपन्यांत काम केले. करिअरमध्ये यश मिळवायचे असेल, तर आपल्या प्रतिभेची चुणूक दिसायला हवी, याची जाणीव त्यांना या काळात झाली. बिझनेसमधील बारीकसारीक गोष्टी शिकण्यासाठी अमेरिकेतील 'येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट'मधून 'मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट'ची पदवी घेण्याचे ठरविले. पगारातून साठलेल्या पैशातून अमेरिकेला जायचे ठरविले. उत्तम गुण मिळाल्यामुळे त्यांना येल विद्यापीठात प्रवेश मिळाला. मात्र, शुल्कासाठी पैसे नसल्याने त्यांनी दिवसा अर्धवेळ अभ्यास केला आणि रात्रीपाळीत रिसेप्शनिस्टचंही काम केलं. तेव्हापासून खरंतर त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. अमेरिकेतील अभ्यास पूर्ण केल्यावर नूयी यांनी बोस्टन कन्सल्टन्सी येथे कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु १९८६ मध्ये झालेल्या एका कार अपघातामुळे त्यांना या नोकरीला राम राम ठोकावा लागला. आणि त्यांनी कॉपोर्रेट स्ट्रॅटेजीमध्ये करिअर करायचं ठरविलं. त्यानंतर मोटोरोला, एबीबी यासारख्या कंपन्यात त्यांनी काही काळ काम केलं. १९९४मध्ये त्यांना पेप्सिकोची ऑफर मिळाली. तिथून त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं.

पेप्सिकोमध्ये त्यांच्यातील नेतृत्वगुणांना अधिक वाव मिळाला. पेप्सिकोच्या विस्कळित कारभाराची घडी सावरण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. स्पर्धक असलेल्या कोका-कोला कंपनीचे वर्चस्व मोडीत काढण्यातही त्यांची मदत झाली. त्यांच्यातील धडाडी पाहून २००६ मध्ये पेप्सिकोचे चेअरमन व सीईओ रेनमुंड यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नूयी यांना आपला उत्तराधिकारी करण्याची घोषणा केली. इंद्रा ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. आज इंद्रा यांचं वार्षिक वेतन तीन लाख डॉलर (१९३ कोटी रुपये) एवढं आहे. त्यांच्यावर पेप्सिकोच्या फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी असून, या विभागात २२ ब्रँड्सचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात सामील होणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. इंद्रा यांच्या कर्तबगारीची दखल घेऊन केंद्र सरकारने २००७ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले आहे.

अमेरिकेत स्थायिक असल्या, तरी भारतीय संस्कृतीचं त्यांना विस्मरण झालेलं नाही. आज यशोशिखरावर असतानाही त्यांना आपल्या क्षमतांची आणि मर्यादांची जाणीव आहे. 'सर्वच गोष्टी आपल्याला एकाच वेळी साध्य होत नाही, मी करिअरमध्ये जरी यशस्वी झाले असले तरी माझ्या संसारात मी फारसं लक्ष नाही घालू शकले नाही. माझ्या मुलींसाठी मी किती योग्यतेची आई आहे, हे मला माहीत नाही. कारण ऑफिससच्या कामामुळे मी त्यांना फारसा वेळही देऊ शकले नाही,' असं त्या प्रांजळपणे सांगतात

No comments:

Post a Comment